शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (पुणे महानगरपालिका)

पुणे शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी पुणे महापालिकेकडून नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच  एक योजना म्हणजे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात. याशिवाय, खासगी दवाखान्यांमध्ये कराव्या लागणार्‍या आवश्यक त्या उपचाराच्या एकूण खर्चात ५० टक्के सूट मिळते.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना या योजनेचे सभासदत्व घ्यावे लागते. योजनेचे सभासद झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेद्वारे एक कार्ड उपलब्ध करुन दिले जाते. या कार्डावर लाभार्थ्याला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये स्वस्त दरात उपचार मिळतात. महापालिकेच्या दवाखान्यातून आवश्यक औषधेदेखील मोफत उपलब्ध होतात.  मात्र, खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी झालेला एकूण खर्च जर एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर एक लाखाच्या पुढील रक्कम लाभार्थ्याला अदा करावी लागते.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकूण २०० रुपये (सभासद नोंदणी शुल्क रु.१०० आणि वार्षिक शुल्क रु.१००) शुल्क आकारले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विभागाकडे असलेल्या विहीत नमुन्यातील छापील अर्जासोबत खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायांकीत प्रत (झेरॉक्स) जोडावी.

  • एक लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असल्याचा तहसीलदार कार्यालयाचा दाखला
  • पिवळी शिधापत्रिका
  • झोपडपट्टीत राहत असल्याची पुणे महानगरपालिकेकडे नोंद असलेली पावती

याशिवाय खाली नमूद केलेली कागदपत्रे व कुटूंबाचा फोटो सादर करणे आवश्यक आहे.

  • रेशनिंग कार्डाची छायांकीत प्रत
  • अपत्यांच्या जन्मदाखल्यांच्या छायांकीत प्रती
  • कुटुंबातील सर्व पात्र सभासदांच्या एकत्रित फोटोच्या दोन प्रती (व्हिजिटिंग कार्ड साईझ)

वर नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे व सभासदत्व शुल्क भरून पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, तिसरा मजला, रूम नं ३३३, शिवाजीनगर येथे शहरी गरीब योजना सभासदत्व कार्डची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे कार्ड गहाळ झाल्यास सभासदाला १०० रुपये भरुन पुन्हा एकदा नवे कार्ड प्राप्त करुन घेता येईल. एका आर्थिक वर्षासाठी हे कार्ड वैध असेल. कार्ड प्राप्त झाल्यानंतरच योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचे सभासदत्व घेणाऱ्या नागरिकाला आपली पती/पत्नी, आई, वडील, दोन अविवाहित अपत्ये (ज्यांचे वय २५ वर्षापेक्षा कमी आहे) यांची नावे समाविष्ट करता येतात. सभासदत्व घेतलेल्या नागरिकाचे तिसरे अपत्य ०१/ ०१/ २००५ पूर्वी जन्माला आले असेल; तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र, अपत्याच्या वयाची २५ वर्षे पूर्ण होण्याआधी त्याचे/तिचे लग्न झाले तर सभासदत्व रद्द होईल.

ज्या नागरिकांना अन्य सरकारी किंवा निमसरकारी कंपनी किंवा विमा कंपनीकडून औषधे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च मिळू शकतो त्यांना या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही.

योजनेच्या सभासदांना पुणे मनपा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या खासगी दवाखान्यांमध्ये अंतर्रूग्ण विभागातील सामान्य (जनरल) वॉर्डमध्ये वैद्यकीय उपचारांकरिता दाखल होता येईल. केवळ जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणार्‍यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.  निमसरकारी, खासगी व डिलक्स रुम घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरपत्रकानुसार प्रदान केले जातील.

या योजनेतील लाभार्थ्यांना पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या पॅनलवर असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतात. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचारांच्या एकुण खर्चापैकी ५० टक्के खर्च महापालिकेमार्फत करण्यात येईल.

  • त्यासाठी लाभार्थ्याला महानगरपालिकेतून उपचारासाठीच्या एकुण खर्चामध्ये ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागेल. हे हमीपत्र घेऊन खासगी रुग्णालयात दिल्यानंतर एकुण रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागेल. ऊर्वरित ५० टक्के रक्कम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येईल. पन्नास टक्के सवलतीचे हमीपत्र प्राप्त करण्यासाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना कार्यालय, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, तिसरा मजला, रूम नं ३४०, शिवाजीनगर येथे भेट द्यावी.